₹170.00
लॉचढभ या स्कॉटिश गावचा इन्स्पेक्टर हॅमिश मॅक्बेथ हा आपल्या प्रेमळ व उमद्या स्वभावामुळे गावातल्या लोकांना अतिशय लाडका असतो. हॅमिशच्या कारकिर्दीत लॉचढभमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमालीचे घटल्यामुळे त्यांची बदली जवळच्या स्ट्रॅथबेन शहरात केली जाते. साहजिकच लॉचढभचे लोक नाराज होतात. गावात अलीकडेच राहायला आलेली मॅगी बेआर्ड हॅमिशला परत आणण्यासाठी नामी शक्कल लढवते. गावात गुन्हे घडत असल्याच्या खोट्या तक्रारी करून ती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याना भंडावून सोडते. अखेरीस हॅमिशची बदली पुन्हा लॉचढभला होते. कॅन्सरच्या दुखण्यातून नुकत्याच बऱ्या झालेल्या ऑलिसन कर्र या आपल्या भाचीसोबत मॅगी गावातल्या एका आलिशान हवेलीत राहत असते. मध्यमवयीन श्रीमंत मॅगी बेअर्ड ही आज जरी लठ्ठ व बेढब दिसत असली तरी तरुण वयात ती अतिशय सुंदर व आकर्षक दिसत असे. चारित्र्याने बदनाम असलेल्या मॅगीने त्या काळात अनेक धनाढ्य व्यक्तींची रखेल होऊन भरपूर माया गोळा केलेली असते. आपले हरवलेले लावण्य पुन्हा प्राप्त करण्याच्या विचाराने मॅगी झपाटून जाते. तारुण्य व सौंदर्य परत मिळवण्याच्या इष्र्येने ती अज्ञातस्थळी निघून जाते. काही दिवसांनी मॅगी जेव्हा आपल्या घरी परतते, तेव्हा तिचे बदललेले रूप पाहून सारे जण थक्क होतात. आपण लग्न करणार असल्याचे मॅगी जाहीर करते व आपला जीवनसाथी निवडण्यासाठी ती एके काळच्या तिच्या चार प्रियकरांना आपल्या हवेलीत येण्याचे आमंत्रण देते. मॅगी कोणाशी लग्न करणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असताना एक विचित्र घटना घडते. मॅगीच्या गाडीला अचानक आग लागते आणि त्या आगीत गाडीसकट मॅगीही भस्मसात होते. हा अपघात की घातपात असा पेच इन्स्पेक्टर हॅमिश मॅक्बेथसमोर उभा राहतो. संशयाची सुई अर्थातच मॅगीची भाची ऑलिसन कर्र व मॅगीचे तरुणपणाचे चार प्रियकर यांच्यावरून फिरू लागते. पाचही जण कफल्लक असतात व मॅगीच्या संपत्तीवर प्रत्येकाचाच डोळा असतो. मॅगीच्या गाडीत स्फोट घडवून आणण्याची संधी पाचही जणांना असते. एरवी सुस्त व आळशी असणारा हॅमिश हातात खुनाची केस येताच एका वेगळ्या रूपात सामोरा येतो. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, उत्तम व्यवहारज्ञान व मानवी मनाचा अचूक वेध घेण्याची विलक्षण क्षमता लाभलेल्या हॅमिश मॅक्बेथ मॅगीच्या खुनाचे रहस्य आपल्या अनोख्या पद्धतीने उलगडत जातो.