₹130.00
‘पुलं’चे जीवन ही एक आनंदयात्रा आहे. आपल्या बहुरूपी व्यक्तिमत्त्वातून, आपल्या विविध कलाकृतींद्वारा त्यांनी साऱ्यांना निखळ आनंद दिला. विदूषक, गायक आणि लेखक या तीन भूमिका वठवून सर्वांचे मनोरंजन करण्यात पु.ल. आनंद मानत. प्रवासवर्णने, व्यक्तिचित्रे, चरित्रे, एकांकिका, नाटके, पटकथा अशा विविध अंगांनी त्यांनी आपली लेखनकला फुलविली. नातवापासून आजीपर्यंत साऱ्यांना आनंदित करणारे पु.लं.चे किस्से या पुस्तकात वाचायला मिळतात. ‘पुलं’चे साहित्य व जीवन यावरची व्याख्याने व ‘पुलं’नी संगीतबद्ध केलेली गाणी असा कार्यक्रम भुर्के दाम्पत्य सादर करत. कार्यक्रम झाल्यावर लोक ‘पुलं’च्या आठवणी सांगत. या आठवणी त्यांनी शब्दबद्ध केल्या. सिनेदिग्दर्शक राम गबाले आणि पंडित भीमसेन जोशी यांच्याकडूनही ‘पुलं’च्या काही आठवणी त्यांना ऐकायला मिळाल्या. श्याम भुर्के यांचे लिखाण विनोदी अंगाने जाणारे आहे. कुठूनही किस्से वाचायला घेतले तरी वाचकांना पु.लं.च्या संगतीत काही काळ आनंदात घालविल्याचा प्रत्यय येईल. पु.लं.चे गुडघे दुखत होते. ढग भरून आले की गुडघेदुखी वाढे. यावर ते गमतीत म्हणत, ‘नभ मेघांनी आक्रमिले हे गाणे रेडिओवर लागले तर ‘नको ते ढग’ म्हणून मी रेडिओची कळ फिरवित असे. ‘मेघदूता’मध्ये तर ढग इतक्या वेळा येतात की ‘मेघदूत’ वाचण्याचं मी बंद केलंय. सध्या ‘मेघदूत’ हाफरेटमध्ये विकायला काढलंय! एकंदरीत या गुडघेदुखीपुढे मी गुडघे टेकलेत.’ कानांना ऐकू कमी यायला लागलंय असं न म्हणता ते म्हणतात- ‘हल्ली कान माझं ऐकत नाहीत!’ ब्लडप्रेशरचा त्रास वाढलाय सांगताना म्हणणार, ‘नको त्या वयात रक्त उसळतंय.’ अशा अनेक चटकदार किस्सेवाचनाच्या आनंदडोहात बुडी मारण्याचे सुख घेण्याची संधी या पुस्तकाद्वारा श्याम भुर्के यांनी वाचकांना उपलब्ध केली आहे.