₹100.00
सांजसावल्यातील लघुनिबंध १९७४ ते १९७६ या काळातले. तसे हे उत्तरार्धातील अंतिम असंकल्पित निबंध. यातील अधिकांश “साप्ताहिक स्वराज्य“ मधून पूर्व प्रकाशित व काही अप्रकाशित आहेत. अन्य “अनुराधा`, “मौज`, “रविवार सकाळ“, “अरुधंती“ च्या दिवाळी वा नियमित अंकातून प्रकाशित झालेले आहेत. खांडेकरांनी आपले आजवरचे लघुनिबंध ज्या समाज सुधारणेच्या भावनेतून लिहिले त्याचे प्रतिबिंब या निबंधातूनही दिसून येते. गुजगोष्टी करायच्या भावनेने लिहिलेल्या या निबंधांची स्वत:ची अशी एक हितगुज शैली आहे. खांडेकरांच्या लेखणीत विषय फुलविण्याचं आगळं असं कौशल्य होतं. या निबंधांतूनही ते पुन:प्रत्ययास येतं. खांडेकरांचे लघुनिबंध केवळ शब्दांचा ललित फुलोरा कधीच नव्हते. त्यांचे निबंध गहरं जीवनचिंतन घेऊन येतात. ते वाचकास नवी जीवनदृष्टी देतात. विषय वौचित्र्य हे खांडेकरांच्या लघुनिबंधांचं व्यवच्छेदक लक्षण! एकाच निबंधात अनेक विचारांचा गोफ खांडेकरच विणू जाणे. त्यांच्या लघुनिबंधांना रंगलेल्या गप्पांच्या बौठकीचं रूप आपोआप येतं. काव्य, विनोद व चिंतनाच्या त्रिविध पौलूंनी नटलेले हे निबंध म्हणजे लेखकाचा एक जीवनशोधच असतो. विचार व भावनेची सुंदर किनार लाभलेले हे लघुनिबंध विकासाच्या आपल्या चरमसीमेवर नि समेवर असताना वाचणे म्हणजे एक आगळी पर्वणीच! माणसाचं आजचं जीवन यंत्रवत झालंय्. ते भोगात रुतलेलं आहे. ईश्वर भक्तीस कुणाला सवड राहिलीय? शिवाय रोज आकसणाऱ्या घरात स्वतंत्र देवघर आज केवळ स्वप्नच! आजच्या नव्या घरातून कोनाडे, खुंट्या, उंबरे, माजघर हद्दपार झाले तसे देवघरही. शिवाय धकाधकीच्या जीवनात आत्मचिंतनास उसंत राहिलीच कुठे? क्षणिक कृतज्ञता नि वांझोटी करुणा हेच आजचं जीवन होऊन बसलंय्. “देवघर” लघुनिबंधात खांडेकर आजचा आपला बुद्धिवादाच्या बौठकीस वासनांच्या शुद्धिकरणाचे अधिष्ठान लाभले तरच वासनेच्या तळघरात रमलेल्या मनुष्याचं उदात्तीकरण देवघराच्या पावित्र्यात होऊ शकेल. आजचा माणूस स्वत:कडे पाहात नाही, तो देवाकडे काय पाहणार? अशी पृच्छा करणारा हा लघुनिबंध वर्तमान सत्याचं अंजन वाचकांच्या डोळ्यात घालणार, नवी जीवनदृष्टी देणार, दैववादाकडून माणसाच्या प्रवासाचा आग्रह धरणारा ठरतो. अंधत्व आल्यानंतर वि. स. खांडेकर दैववादी विचारधारेवर अधिक खोल विचार करत होतेहे “सांजसावल्या“ मधील निबंध वाचताना वारंवार जाणवत राहातं. खांडेकरांचे लघुनिबंध बहारीचा प्रारंभ, वैचित्र्यपूर्ण विकास नि तात्त्विक अंत अशा त्रिविध वौशिष्ट्यांनी कलात्मक होत राहिले. त्यांच्या निबंधात स्वौर कल्पनाविलास, साध्या विषयातून व्यापक आशय, विषयापेक्षा निबंधकाराच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंबन, जिव्हाळ्याच्या मित्राशी संवाद केल्याप्रमाणे असलेली लेखन शैली, चमत्कृती, अशी अनेक वौशिष्ट्ये आढळतात. खांडेकरांच्या निबंधातून विषय, ओघ, मांडणी, कल्पना, भावना, तत्त्व, भाषा, निष्कर्ष असा अष्टांगी चमत्कार आढळतो. त्यामुळे ते वाचकांना सतत साद घालत राहिले आहेत.