₹50.00
एक अत्यंत संपन्न, अत्यंत सुसंस्कृत कुटुंब. मुलांचे लाड खूप व्हायचे, पण शिस्तही तितकीच कडक असायची, कपडे साधे असायचे. असं ठासून मनावर बिंबवलं जायचं, की गरिबी, मळके कपडे यात लाजिरवाणं काहीही नाही; खोटं बोलणं, वाईट वागणं हे लाजिरवाणं आहे. शिक्षण इंग्लंडमध्ये हॅरो आणि ऑक्सफर्डला. इतिहास राहिला बाजूला, नोकरीला लागले एका मोठ्या कारखान्यात रोजावर मजूर म्हणून! कष्ट करण्याची तयारी, माणसांना समजून घेणं, माणसं जोडता येणं, सर्वांशी मिळतं घेणं हे खास विशेष गुण. शिस्तीचे आग्रही. उत्तम कलांची आवड, उत्तम खाण्याची, पिण्याची, संगीताची, पाश्चिमात्त्य नृत्याची जाण व आवड. उत्तम वक्ते, भरपूर वाचन, कारकिर्दीत प्रचंड प्रगती. ……..सगळंच छान? दु:ख कशाचंच नाही? आहे ना! पण त्याचं प्रदर्शन नाही. नोकरीत अन्याय झाला– दुसरी कंपनी काढली! इतकी बहुरंगी, बहुढंगी, आगळीवेगळी, विलक्षण व्यक्ती आहे तरी कोण? ज्यांनी जमशेटपूरच्या टिस्कोमध्ये एकूण त्रेपन्न वर्षं सलग काम केलं, त्यातली नऊ वर्षं अध्यक्ष व प्रमुख संचालक म्हणून काम करून कंपनीची विक्री व नफा प्रचंड प्रमाणात वाढवला, ते आता नव्वदी पार केलेले, तरीही कामात व्यग्र असलेले आणि मजेत जगणारे, हे आहेत.