₹295.00
डॉ. आनंद यादव यांचा प्रस्तुत ग्रंथ म्हणजे, ‘साहित्याची निर्मिती कशी होते?’ या जटिल प्रश्नाची उकल करणारा एक महत्त्वाचा तात्त्विक ग्रंथ होय. मराठीत तरी हा ग्रंथ एकमेव, नि अजोड म्हणावा लागेल. कलावंताच्या मनात कलाबीज कसे पडते, कलावंताचा व्यावहारिक अनुभवाकडून कलाअनुभवाकडे प्रवास कसा होतो, साहित्यप्रकारापेक्षाही, व्यक्त होणाऱ्या अनुभवाचीच मातब्बरी कलावंताला कशी वाटत राहते, नव्या साहित्यप्रकाराच्या शोधात कलावंत केव्हा नि कसा गुरफटतो, साहित्यिकाचा निर्मितिगत कलानुभव आणि रसिकाचा आस्वादगत कलानुभव यांमध्ये तफावत का पडत जाते इत्यादी विविध प्रश्नांची सखोल, साधकबाधक मीमांसा डॉ. यादव या ग्रंथात करतात. मुख्य म्हणजे ही चर्चा सफल व्हावी; म्हणून ते ‘गोतावळा’, ‘नटरंग’, ‘भय’ यांसारख्या आपल्या ललितकृतींच्या निर्मितिप्रक्रियांचा त्रयस्थ नि तटस्थ दृष्टीकोणातून शोध घेतात. डॉ. यादवांसारख्या एका प्रथितयश कलावंताने स्वमनातील चिंतनाच्या आधारे लिहिलेला प्रस्तुत ग्रंथ म्हणजे ‘कलावंताची लेखनविद्या’ या मराठीतल्या नव्या अभ्यासशाखेचा आरंभबिंदू होय. — डॉ. दत्तात्रय पुंडे