₹90.00
अगदी छोट्यात छोट्या विषयांवरून तात्विक विचार सहजतेने मांडण्याची डॉ. विनीता पराजंपे यांची हातोटी चांगली आहे. लघुकथांच्या जवळ जाणारे हे छोटे, छोटे लेख त्यामुळेच वाचकाला आवडतात, वाचनाची असोशी असता असताच संपूनही जातात आणि त्यामुळेच मनात रेंगाळत राहतात. पहिल्या लेखात त्यांनी स्पर्श किती प्रकारचे असतात, याविषयी सांगितले आहे. यात शारीरिक स्पर्शाबरोबरच मनावर मोरपिसासारख्या अलगद उमटत असणा-या स्पर्शांचेही वर्णन केले आहे. परीक्षेसाठी बाहेर पडताना आजी-आजोबांनी सुरकुतलेल्या हातांनी दिलेल्या आशीर्वादाच्या स्पर्शाच्या बळाविषयी लेखिका सांगते; त्याप्रमाणेच पावलांना होणा-या गवताच्या पात्यांचा मुलायम स्पर्शही सुखावून जातो. प्रत्येक स्पर्श दुस-याहून कसा वेगळा तेही लेखिका सांगते. त्या स्पर्शांचे अर्थ सांगते. बाळाच्या गालांचा स्पर्श सृजनाचा; तर रात्रीच्या अंधारात होणारा थंडगार स्पर्श अंगावर भीतीचा काटा फुलविणारा, असे अनेक अर्थ आणि स्पर्शांच्या छटा उलगडून सांगितल्यानंतर लेखिका अखेर मृत्यूसमयीच्या थंड स्पर्शांपर्यंत येते आणि आयुष्यभर हवाहवासा वाटणारा आणि नवरसांच्या विविध संवेदना जागवणारा आपल्या माणसांचा स्पर्श मृत्यूसमयी मात्र नकोसा होतो, हे भीषण वास्तव मांडून जाते. लेखिकेला वाटते, की आपल्या अनुभवांची भर घालून मुलांना अनुभवांची शिदोरी देणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. कारण बाहेर मिळणा-या अनुभवांची अनेक उत्तरे या शिदोरीतही असतात. एकूणच, मनाच्या तरल अवस्थेत सांगोपांग विचार करून मांडलेले विचार या ललित लेखनात आहेत.