₹140.00
‘शेतकऱ्याचा असूड’ हे महात्मा जोतीराव फुले यांनी निर्मिलेले फार सुंदर रूपक आहे. शेतकऱ्याच्या खांद्यावर असणारा हा असूड केवळ शेतकीत साहाय्य करणाऱ्या जनावरांसाठीच वापरला जातो असे त्यांना वाटत नाही. सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध आणि शोषकांविरुद्धही हा असूड वापरला पाहिजे. दुष्टांच्या निर्दालनासाठी आणि सत्याच्या प्रस्थापनेसाठी या असूडाशिवाय दुसरे कोणते समर्थ साधन शेतकऱ्यांच्या हाती आहे? एवढेच नाही, तर इथल्या सोवळ्याओवळ्याला कंटाळून आणि शेतकऱ्याच्या घरात खाण्यापिण्यास काही उरले नाही म्हणून लक्ष्मी सातासमुद्रापलीकडे तिच्या पित्याच्या घरी गेली. एकदा लक्ष्मी अंतरली की, दु:ख आणि दारिद्र्याशिवाय शेतकऱ्याच्या घरी उरणार तरी काय? तेव्हा तिला परत आपल्या देशात नांदावयास आणावयाचे असेल, तर शेतकऱ्यास सर्व प्रकारच्या विद्या शिकविल्या पाहिजेत. एकदा शेतकरी विद्वान झाला की, तो खांद्यावर असूड टाकून लक्ष्मीला पुढे घालून आपल्या घरी नांदावयास घेऊन आल्याशिवाय राहणार नाही! हळूहळू भव्य होत जाणारे हे सुंदर रूपक असंख्य अर्थांची प्रतीती देऊन आपणास नवेच भान आणते.