₹350.00
जेन वाँग या, तिसNया पिढीतील चिनी-कॅनेडियन, पुरस्कारविजेत्या लेखिकेचे हे चीनसंबंधीचे तिसरे पुस्तक. सन १९७०च्या दशकाच्या सुरुवातीला बीजिंग विद्यापीठामध्ये मँडरिन भाषा शिकण्यासाठी प्रवेश मिळणाऱ्या पहिल्या दोन विद्यार्थिनींपैकी एक. माओ झेडाँग यांच्या `सांस्कृतिक क्रांतीच्या` ऐन बहराचा तो काळ होता. एकीकडे साम्यवादी विचारसरणीचे आकर्षण, तर दुसरीकडे कॅनडामध्ये परकेपणा अनुभवल्यामुळे कोठेतरी आपली चिनी ओळख पटवण्याची, त्यांच्यामध्ये सामावले जाण्यासाठी धडपड अशा द्वंद्वामध्ये सापडलेल्या लेखिकेच्या हातून अजाणतेपणे एक चूक झाली आणि त्यामुळे तिच्या मैत्रिणीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मनावरील दडपण असह्य झाल्याने आणि जमले तर झालेल्या चुकीचे परिमार्जन करण्याच्या उद्देशाने, तब्बल चौतीस वर्षांनी जेन वाँग चीनच्या राजधानीत, एक महिन्याची रजा घेऊन परतली. तिच्या हातामध्ये एक महिना होता आणि एकशेतीस कोटींच्या लोकसंख्येतून, संपूर्ण नावही धडपणे माहीत नसलेल्या मैत्रिणीला शोधून काढण्याचे आव्हान तिच्यासमोर होते. काहीही झाले तरी तिला तिच्या चुकीचे परिमार्जन करायचे होते. `यीन`ला शोधून तिची माफी मागायचीच होती आणि जमले तर तिच्यासाठी काहीतरी करायचे पण होते. `यीन`चा शोध घेण्याच्या प्रयत्नांत आणि जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठींतून तिने चीनमधील गेल्या ५० वर्षांत झालेल्या सामाजिक, र्आिथक, सांस्कृतिक आणि राजकीय बदलांचा शोध पण घेतला आणि चीनच्या साम्यवादाकडून भांडवलशाहीकडे झालेल्या प्रवासादरम्यान चिनी जनतेच्या जीवनात झालेले परिवर्तन आणि मानसिकतेमधील झालेले बरेवाईट बदल पण संवेदनक्षमतेने टिपले. सामाजिक, आर्थिक बदलांविषयीची तिची निरीक्षणे आणि त्यावरील भाष्य आपल्याला पण कोठेतरी ओळखीचे वाटते. यीनला शोधण्यात ती यशस्वी झाली का? चढउतारांनी भरलेल्या आयुष्यात यीनने काय-काय भोगले होते? यीनने जेनला माफ केले का? जेनच्या शोधाची आणि यीनच्या आयुष्याची चित्तवेधक आणि हेलावून टाकणारी कहाणी म्हणजे हे पुस्तक- `बीजिंगचे गुपित`.