₹250.00
या कादंबरीचा विषय पत्रकारितेभोवती फिरणारा आहे. पत्रकारिता व राजकारण यांचं एक बेमालूम रसायन असतं. त्यामध्ये चढाओढ, कुरघोडी, काटछाट, रस्सीखेच, डावपेच ही राजकारणाची अंगप्रत्यंगही पाहावयास मिळतात. विविध प्रलोभनांचीही खिरापत चालू असते. काहीजण त्यात अडकतात अन् स्वत्व गमावून बसतात. स्वातंत्र्यपूर्व काळात पत्रकारिता ध्येयवादानं भारलेली होती. कालमानानुसार त्यात बदल झाले, काही चांगले, काही न रुचणारे. महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी सर्व गोठींचा वापर करणारेही अनेक असतात. व्यवसायात प्रवेश करून कालांतरानं राजकारणात उडी घेणारे आणि तेथे हात पोळले की व्यवसायात परतणारेही आहेत. त्याचप्रमाणे प्रवाहात वाहून जाणारे, हात पोळल्यावर सावरणारे, परिस्थितीशी झुंज देणारे, जाळ्यात अडकणारे असे अनेक प्रकार आढळतात. बहुतेकांचं जीवन चाकोरीबद्ध असतं. रेल्वेच्या रूळांसारखे समांतर रेषेत चालणारे अनेक. स्थानक जवळ यायला लागलं की, गाडी रूळांच्या निरनिराळ्या सांध्यावरून वळणं घेत पुन्हा समांतर रूळांवर येते, तशी काहींची स्थिती. काहीजण त्रिकोणात तर काही चौकोनात फिरताना दिसतात; इच्छेनुसार मार्ग आखणारेही असतात; पण सर्वांनाच हवं ते ध्येय गाठता येतं, असं नाही. ’जयपूर पत्रिका’मध्ये काम करणारी नैना अशीच एक पत्रकार. ही राजस्थानच्या पोलीस खात्यातील मोहनलाल रजपूत यांची उच्चशिक्षित कन्या. अभयच्या प्रेमापायी घरच्यांची पर्वा न करता तिनं दिल्ली गाठली. संसाराला हातभार लावताना ती पत्रकार झाली खरी; पण तिच्या आयुष्याच्या कॅनव्हासवर नियतीनं वेगळेच रंग भरले होते. अभयशी लग्न होऊन दहा वर्षं झाली होती. या काळात बरंच पाणी वाहून गेलं होतं. मूलबाळ नसल्यानं तिला घरची तशी ओढ राहिलेली नव्हती. म्हणूनच पत्रकारितेच्या व्यवसायात तिनं पूर्ण झोकून देण्याचं ठरविलं. अभयचा व्यवसाय म्हणावा, तसा ठीक चाललेला नव्हता. तो व्यवसायात स्थिर होत नव्हता. पैशाची नेहमीच ओढाताण होत असे. तिच्या नोकरीमुळे कसंबसं घर चालत होतं. त्यातच पत्रकारितेच्या व्यवसायात असलेली असंख्य प्रलोभनं तिच्याभोवती रुंजी घालीत होती. तिने आजवर त्यांना चार हात दूर ठेवलं होतं, परंतु त्यांना कायमचं दूर ठेवता येईल काय? याचं उत्तर मात्र तिच्याकडं नव्हतं. भोवतालच्या परिस्थितीचा प्रत्येकावर काही न काही परिणाम होत असतो. प्रवाहाच्या उलट दिशेनं जाण्याचं धैर्य फारच कमी लोकांमध्ये असतं. आजवर टिकवून ठेवलेलं धैर्य खचेल काय, अशी शंका तिला येत असे. संघर्ष आणि तडजोड या समांतर रेषेत चालणारं तिचं आयुष्य हळूहळू प्रलोभनांच्या भोवर्यात गुरफटू लागलं. आशा-आकांक्षा अन् महत्त्वाकांक्षा यांची रस्सीखेच सुरू झाली. यातूनच निर्माण झालेल्या त्रिकोणांना ती शेवटपर्यंत टाळू शकली नाही. आपल्या आयुष्याचे शिल्पकार आपणच असतो की अन्य कोणी या प्रश्नाचं उत्तर ती शोधत राहिली.