₹260.00
एल्व्हा अगियानोचा खून दहा वर्षांपूर्वी तिचा नवरा ब्रुनो यानं केला. त्यांच्या चार मुलांपैकी तिघांनी वडिलांशी संबंध ठेवणं नाकारलं, त्यांना वडिलांबरोबर एक शब्दही बोलायची इच्छा नव्हती. नवलाची बाब म्हणजे त्यांच्या तिस-या अपत्यानं– नतालियानं– आपले वडिलांबरोबरचे संबंध कायम ठेवले. एवढंच नव्हे, तर तुरुंगात त्यांना वरचेवर भेटून तिनं त्यांचा विश्वास, प्रेम आणि मैत्री संपादन केली. २००६ साली ब्रूनोला तुरुंगातच मूत्रिंपडाच्या कर्करोगानं मृत्यू आला. ही कहाणी या नतालियाची– अचंबित करून सोडणारी! प्रेमळ आणि एकनिष्ठ एल्व्हा समुद्रकिना-यावरच्या एका छोट्याशा गावात लहानाची मोठी झाली. तिच्यापेक्षा वयानं ब-याच मोठ्या असलेल्या एका देखण्या तरुणाशी तिचे प्रेमाचे धागे बांधले गेले. प्रेमात आकंठ बुडालेल्या एल्व्हाची एकच इच्छा होती– ब्रुनोशी लग्न करून प्रेमळ पत्नी आणि कर्तव्यदक्ष आई म्हणून जगायचं. परंतु तिच्या पूर्वायुष्यातल्या एका काळ्याकुट्ट गुपितामुळे ती आपल्या नव-याच्या शंकेखोर, कुढणा-या, स्वार्थी, आत्मकेंद्रित स्वभावाला बळी पडली. घराच्या चार भिंतींच्या आड तिचं आयुष्य बंदिस्त झालं. तिच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. नव-याच्या जुलमी स्वभावाचा केवळ तीच नव्हे तर तिची मुलंही बळी ठरली. त्यानं या सगळ्यांची शारीरिक, तसंच मानसिक छळवणूक केली. या सगळ्याला कंटाळून वयाच्या १७ व्या वर्षी नतालिया घराबाहेर पडली. पण तिथेही तिच्या वाट्याला दुर्दैवाचे दशावतारच आले. आयुष्य एकटीच्या हिमतीवर जगायचं आव्हान तिनं स्वीकारलं खरं; पण तसं करताना तिची अनेकवेळा, अनेक प्रकारे फरफट झाली. शेवटी तिनं एल्व्हाला घर सोडून बाहेर पडण्यास उद्युक्त केलं. सगळ्यात धाकट्या मुलाला– डॅनियलला घेऊन एल्व्हा बाहेर पडली अन आयुष्यात पहिल्यांदाच तिला स्वातंत्र्याची गोडी चाखायला मिळाली. पण तिचं नशीब बलवत्तर नव्हतं, हेच खरं! ब्रुनोनं तिला विनंती केली, `डॅनियलला भेटायची फार इच्छा आहे, एकदा त्याला घेऊन ये ना!` भोळ्याभाबड्या; परंतु भयशंकित एल्व्हानं त्याची विनंती मान्य केली. ती नव-याच्या घरी गेली अन त्यानं सुरीचे वार करून तिचा निर्घृण खून केला. अनेक अडचणींना तोंड देऊन नतालियानं वडिलांना आधार देण्याचं अपरिमित धैर्य दाखवलं. परिणामी, तिच्या उरल्यासुरल्या कुटुंबाची– भावंडांची– अन् तिची फारकत झाली. एक मानसिक रुग्ण असलेल्या ब्रूनोला कडक सुरक्षाव्यवस्था असलेल्या मनोरुग्णालयात रॅम्पटन या गावी ठेवण्यात आलं. तिथेच त्यांना भेटताना नतालियाला हरवलेलं पितृप्रेम पुन्हा एकदा हळूहळू गवसलं. या प्रदीर्घ वाटचालीत तिला आईच्या एकमेव, परंतु मौल्यवान उपदेशाची साथ लाभली– प्रेम करायचं तर निरपेक्ष आणि नि:स्वार्थी भावनेनं! तेच खरं प्रेम!