₹160.00
आत्मचरित्राची वाङ्मयीनदृष्ट्या सर्वांगीण आणि तात्त्विक चर्चा करणारा स्वतंत्र असा ग्रंथ नव्हता. त्या दृष्टीने `आत्मचरित्र मीमांसा` हा मराठीतील पहिलाच ग्रंथ. आत्मचरित्राच्या प्रेरणा, विषय, लेखनाची पूर्वतयारी, आत्मचरित्रकाराचे लेखकीय गुणधर्म, आत्मचरित्र आणि कादंबरी, इत्यादींविषयी सविस्तर चर्चा या ग्रंथाच्या निमित्ताने प्रथमच मराठीमध्ये उपलब्ध होत आहे. एवढेच नव्हे तर, आत्मचरित्राचे अनेक प्रकार असतात याची जाणीव डॉ. यादव मराठी वाचकांना प्रथमच करून देत आहेत. आत्मचरित्र आणि चरित्र यांच्या स्वरूपात मुळात भेद कसा आहे, हे मराठीत प्रथमच डॉ. आनंद यादव सांगत आहेत. आत्मचरित्राचे वाचन कोणत्या हेतूने करावे, आत्मचरित्राचे मूल्यमापन वाङ्मयीनदृष्ट्या कसे करावे, याविषयीचा डॉ. यादवांचा दृष्टिकोन या ग्रंथात लक्ष वेधून घेतो. स्वातंत्र्योत्तर काळातील, विशेषत: १९७० नंतरच्या आत्मचरित्रांची समीक्षा कशी करावी याविषयीचे मौलिक मार्गदर्शन या ग्रंथात सूत्ररूपात मिळते. डॉ. आनंद यादव स्वत: आत्मचरित्रकार आहेत. त्यांनी झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या चार भागांत आत्मचरित्राचे लेखन १९८० ते १९९६ असे १५१६ वर्षे केले. या चिंतनशील आणि संवेदनशील लेखकाच्या स्वानुभवचिंतनातून उतरलेल्या आत्मचरित्रमीमांसा या ग्रंथाचे मोल त्यामुळे आणखी वृद्धिंगत होते.