₹150.00
मागच्या पिढीतील थोर तत्त्वचिंतक कादंबरीकार कै. वामन मल्हार जोशी यांच्या निवडक चौदा निबंधांचा श्री. वि. स. खांडेकरांनी संपादित केलेला हा संग्रह आहे. तत्त्वविवेचक व वाङ्मयविवेचक या दुहेरी भूमिकेत वामनरावांनी जे लेखन केले आहे, त्यामुळे मराठीतल्या पहिल्या प्रतीच्या निबंधकारांत आणि टीकाकारांत त्यांची सदैव गणना केली जाईल. त्यांच्या निबंधांचे बळ आकर्षक भाषाशैलीत, प्रचाराच्या तीव्रतेमुळे येणार्या आवेशात, सौंदर्याने मनाला मोहून सोडणार्या कल्पकतेत, देशभक्तीसारख्या वाचकाच्या एखाद्या आवडत्या भावनेला मिळणार्या आवाहनात किंवा सर्वसामान्य मनुष्याला रंजक रीतीने प्राप्त करून दिलेल्या ज्ञानात नाही. विचार-प्रवर्तन हा त्यांच्या निबंधाचा आत्मा आहे. ताक घुसळून जसे लोणी काढावे, त्याप्रमाणे वामनराव अत्यंत समतोलपणे सत्यसंशोधन करतात. सांकेतिक सत्यांची, रूढ विचारांची, परंपरागत कल्पनांची पिंजण त्यांच्याइतक्या कुशलतेने दुसर्या कोणी क्वचितच केली असेल. विचार पारखून घेण्याची त्यांची ही असामान्य शक्ती लक्षात घेतली, म्हणजे त्यांचे स्थान राजवाडे, डॉ. केतकर वगैरेंच्या पंक्तीतच आहे, हे त्यांना संशयात्मा म्हणणार्या टीकाकारांनाही कबूल करावे लागेल.