₹90.00
श्री. वि. स. खांडेकर यांनी संपादित केलेल्या पंधरा लघुनिबंधांचा हा प्रातिनिधिक संग्रह आहे. या संग्रहात सर्वश्री वामन मल्हार जोशी, आचार्य काका कालेलकर, साने गुरुजी, ना.सी. फडके, कुसुमावती देशपांडे, वि. पां. दांडेकर, अनंत काणेकर डॉ.श्री. स. भावे, र. गो. सरदेसाई, वि. द. साळगावकर, बा. भ. बोरकर, वि. ल. बर्वे, ना. मा. संत, वि. वा. शिरवाडकर आणि खुद्द खांडेकर यांच्या लघुनिबंधांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या ललित गद्यलेखनाला आज आपण `लघुनिबंध` म्हणतो, तो खया अर्थाने १९३० च्या आसपास मराठी साहित्यात रूढ झाला. तेव्हापासून आतापर्यंत या साहित्यप्रकाराचा कसकसा विकास होत गेला, त्याचा आलेख आपणांस ह्या संग्रहात सुस्पष्टपणे पाहावयास मिळतो. सर्वसामान्य लघुनिबंधात लेखकाच्या सामर्थ्याप्रमाणे काव्य, विनोद व तत्त्वज्ञान या तिन्हींचे मिश्रण होत असते. किंबहुना त्या संमिश्र मनोवृत्तीने, दुधात साखर आणि केशर मिसळून जावीत, तसे या तिन्हींचे मिश्रण मनात होऊन तो लघुनिबंधलेखनाला प्रवृत्त होतो. तथापि, या प्रातिनिधिक प्रकारातही एकमेकांजवळून वाहणारे दोन प्रवाह आहेत. पहिल्यात तंत्रनिष्ठेने येणारा डौल मोठ्या प्रमाणात दिसतो. दुसयात स्वाभावनिष्ठतेमुळे निर्माण होणारा जिव्हाळा जसा अधिक आढळतो, तशीच कल्पना व विचार यांची स्वैरता अधिक, अंतर्मुखता किंवा चिंतनशीलता यांमुळे येणाया गांभीर्याच्या छटाही थोड्या अधिक गडद असतात. एवंगुणविशिष्ट अशा या लघुनिबंधसंग्रहाचे संपादन सुजाण आणि चोखंदळ वाचकांसाठीच करण्यात आले आहे.