₹300.00
वेरूळ लेण्यांतील शिल्पवैभव’ हे पुस्तक लेखिका राधिका टिपरे यांनी इतिहास आणि पुराणे यांचा सूक्ष्म अभ्यास करून लिहिले आहे. शिल्पांच्या मुद्रेवरील भावभावनांचा वेध घेत, त्यांच्याशी संवाद साधत लालित्यपूर्ण शैलीत त्यांनी शिल्पांचे तपशीलवार वर्णन केले आहे. बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मीयांनी राजाश्रयाने तीन कालखंडात या लेण्यांची निर्मिती केली आहे. इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून प्रारंभ झालेली निर्मिती प्रक्रिया एक हजार सालापर्यंत सुरू होती. अगणित अनाम शिल्पकारांनी पिढ्यांन्पिढ्या परिश्रम करून हे अद्भुत शिल्पविश्व साकारले आहे, तेही मर्यादित साधनांच्या साहाय्याने. भारताला प्राचीन अशी सांस्कृतिक परंपरा आहे. उदार, सहिष्णू आणि चंडप्रतापी राज्यकत्यांचे शासन त्या काळी वास्तत्वात होते. भारतात अनेक ठिकाणी लेण्यांतील विलोभनीय शिल्पकला तत्कालीन कलेची साक्ष देत आहे. औरंगाबादजवळील वेरूळची लेणी त्यातलीच एक. सुमारे दोन किलोमीटरच्या परिसरातील पाषाण खोदून त्यात कोरलेली समूहशिल्पे वेद-उपनिषिदे, पुराणांतील देव-देवता आणि त्यांचे अलौकित्व विषद करतात. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिास्थितीचे प्रतिबिंब या शिल्पकलेतून व्यक्त होते. जीवनमूल्यांना आध्यात्मिक आधार देणारी शिल्पकला आपल्याला जीवन जगण्याची नवी दृष्टी देते. द्वैत-अद्वैत, सगुण-निर्गुण, आकार-निराकार आणि परमेश्वराची निरामयता या गोष्टींना मानवी पातळीवर उद्धृत केले आहे ते या शिल्पकलेनेच. काळ्या पत्थरातून जिवंत झालेला आपला भूतकाळ कोरीव शिल्पांतून मूकपणे आपल्याशी संवाद साधीत असतो. मूर्तीमधून जणू भावनांचा स्रोत निर्माण होतो, तो आपल्या व्यक्त-अव्यक्त अशा कल्पनांना छेद देणारा ‘लोकसंवाद’च असतो. या पुस्तकातील वेरूळ लेण्यातील प्रत्येक शिल्पाचा इतिहास किंवा पौराणिक संदर्भ वाचून लेण्यांचे अवलोकन केले, तर मिळणारा आनंद कै. पटींनी अधिक असेल, यात शंकाच नाही!