₹80.00
खलिल जिब्रानच्या `द फोअर रनर` (अग्रदूत) या पुस्तकातल्या अठरा रूपककथांच्या श्री. वि. स. खांडेकरांनी केलेल्या अनुवादांचा हा क्रमाने दुसरा संग्रह आहे. `सुवर्णकण` हा जिब्रानच्या अनुवादित रुपककथांचा या आधीचा संग्रह. जिब्रानमध्ये कवी, टीकाकार व तत्त्वज्ञ या तिघांचं मिश्रण झालं आहे. या त्रिवेणी संगमामुळं त्याच्या कथांची रम्यता वाढली आहे; पण त्या रम्यतेबरोबर गूढतेनंही तिथं प्रवेश केला आहे. सामान्य वाचकाला मूळ कथेचं मर्म अधिक स्पष्ट व्हावं, तिचा रसास्वाद अधिक सुलभतेनं घेता यावा, बाह्यत: जी त्याला काळोखानं भरलेली गुहा भासत असेल, तिथं उज्ज्वल प्रकाशानं नटलेलं सुंदर भूमिगत मंदिर आहे, याची जाणीव त्याला व्हावी, या हेतूनंच जिब्रानच्या अत्यंत अर्थपूर्ण आणि गूढरम्य कथांखाली सुंदर विवेचन करण्याची प्रथा श्री. खांडेकरांनी सुरू केली. या छोट्या छोट्या कथा वाचताना, जीवनातल्या सर्व विसंगती पूर्णपणे ठाऊक असूनही, त्याच्यावर उत्कट प्रेम करणाऱ्या, आपल्या कल्पकतापूर्ण उपरोधानं, ढोंग, जुलूम, असत्य, अन्याय यांचं हिडीस स्वरूप स्पष्ट करून दाखवणाऱ्या आणि जगातलं मांगल्य वृद्धिंगत व्हावं, म्हणून तळमळणाऱ्या आत्म्याचं दर्शन वाचकांना घडेल; आणि त्या आत्म्याच्या सान्निध्यात, घटकाभर का होईना, ते अधिक उन्नत, अधिक मंगल आणि अधिक विशाल अशा जगात वावरू लागतील, अशी खात्री वाटते.