₹70.00
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची राष्ट्रपतिपदासाठी निवड करण्यात आली आणि सारा देश कधी नव्हे इतका हरखून गेला. एक जगद्विख्यात शास्त्रज्ञ, संशोधक देशाच्या सर्वोच्च पदावर बसणार ही कल्पनाच एका परीने अद्भुतरम्य होती. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारख्या एका थोर तत्त्वज्ञानंतर – डॉ. कलाम राष्ट्रपतीपद भूषवणार होते. राजकीय नेतृत्वाने भारतीयांना दिलेला तो एक अनपेक्षित आणि तरीही सुखद असा धक्काच होता. आपल्या एका वर्षाच्या कारकिर्दीत डॉ. कलाम यांनी त्या पदाची शान वाढवली होती. कसलाही डामडौल, दिमाख न दाखवता, ते स्वतंत्र भारताच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत आहेत, त्यांच्या पूर्तीसाठी ते तरुणांना, विद्याथ्र्यांना अगदी मनोमन प्रोत्साहन देत आहेत. त्यासाठी ते सा-या देशभर मोठ्या उत्साहाने संचार करत आहेत. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात ते खास तरुणांसाठी, शाळकरी मुलांसाठी आवर्जून वेळ काढत आहेत. प्रसंगी राजनैतिक शिष्टाचार गुंडाळून ठेवत आहेत. डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वात शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व स्वदेशाभिमान यांचा सुरेख संगम आढळतो. त्यामागचे कारण एकच आहे. ते म्हणजे, त्यांनी सांप्रतच्या परिस्थितीचे ठेवलेले अचूक भान, शास्त्र काट्यावर तोलून घेतलेले आहे. देशातील समस्त तरुण-तरुणींनी त्यांच्या चरित्राचा लक्षपूर्वक वेध घेण्याची गरज आहे. त्यावरून जेवढा बोध घेता येईल, तेवढा जरूर घ्यावा. त्यांनी पाहिलेल्या स्वप्नपूर्तीतील आपले योगदान निश्चित करावे. हेच या पुस्तकाचे प्रयोजन आहे.