₹150.00
‘वुमन ऑन टॉप’ किताबाच्या मानकरी ठरण्यासाठी नोकरीच्या वाटचालीत शेवटी त्या आभासमय, अभेद्य अशा ग्लास सिलिंगला छेद देण्याची, ‘बॉस’ होऊन खास तुमच्यासाठी अभिरुचीपूर्ण, कलात्मकतेने सजवलेल्या ऑफिसच्या खिडकीतून बाहेरचं विहंगम दृश्य न्याहाळण्याची मनोकामना नोकरी करणा-या प्रत्येक स्त्रीच्या मनात सुप्तावस्थेत दडलेली असतेच. पण ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी निश्चित कोणत्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत, ह्याची मात्र त्यांना माहिती असतेच असं नाही. ‘टॉप’ला पोहोचताना विशेषत: स्त्रियांना अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार कराव्या लागतात. नोकरीच्या ठिकाणी मुसंडी कशी मारायची, स्वत:चं व्यक्तिमत्त्व अंतर्बाह्य कसं खुलवायचं, लैंगिक छळाला कसं तोंड द्यायचं, बॉस कोणकोणत्या प्रकारचे असतात, घर-संसार आणि नोकरी यांच्यातला समतोल करिअरचं आव्हान पेलत असतानाच कसा संंभाळायचा… या सगळ्या विषयांचा संबंधित बारकाव्यांविषयी नर्म विनोदी शैलीत परामर्श घेणारं पुस्तक कसं असावं, याचा ‘वुमन ऑन टॉप’ हे सीमा गोस्वामी या नाणावलेल्या लोकप्रिय पत्रकाराने लिहिलेलं पुस्तक म्हणजे एक आदर्श नमुनाच ठरावा.