₹160.00
लोकप्रिय अमेरिकन लेखिका करोल हिगिन्स क्लार्क हिच्या रेगन रैली मालिकेतील ‘झॅप्ड’ ही एक उत्कंठावर्धक रहस्यकथा. लॉरेन लिली ही हॉलीवूडमध्ये पदार्पण करू पाहणारी एक नटी. न्यूयॉर्कच्या जे.एफ.के विमानतळावरून टॅक्सीतून मॅनहॅटनमधल्या तिच्या घरी परत येत असते. वाटेतच तिचा धनाढ्य नवरा फोन करून घटस्फोटाची नोटीस देत असल्याचे तिला सांगतो. तेवढ्यात न्यूयॉर्क शहराचा वीज पुरवठा खंडीत होतो आणि संपूर्ण शहर काळोखात बुडून जाते. या काळोखात अनेक गोष्टी होत असतात. एका छोट्या जागेत ‘स्टँड अप कॉमेडीचा शो’ बघण्यासाठी वीकएन्डच्या निमित्ताने गर्दी झालेली असते. दोन व्यक्ती लॉरेनच्या घराचे कुलूप तोडण्याच्या खटपटीत असतात. एका निष्पाप तरुणाला आपल्या जाळ्यात फसवून जन्माची अद्दल घडवण्याच्या उद्देशाने एक तरुणी त्याच्या मागे हात धुवून लागलेली असते. सगळी तरुणाई नाक्यावरच्या बारमध्ये जमा होते. घरात बसून अंधारात दुसरे काहीच करण्यासारखे नसल्याने लोक चौकाचौकात जमून ‘बार्बेक्यू पार्टी’ करत धमाल करत असतात. ब्लॅकआउटच्या रात्री वरवर वेगवेगळ्या वाटणाऱ्या या घटनांची सांगड घालत लेखिकेने मोठ्या कौशल्याने एका उत्कंठावर्धक कथानकाची गुुुंफन केली आहे. कथानक न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन या भागात घडते. जेथे दिवे दिवसासुद्धा चालू असतात त्या मॅनहॅटनवर आता अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. रात्र सरत जाते तसा गुंता सुटत जातो आणि हडसन नदीवर सूर्याचे प्रथम किरण पडता-पडता सर्व काही आलबेल होते आणि वाचक सुटकेचा नि:श्वास टाकतो. एका रात्रीत घडणारे हे कथानक वाचून होईपर्यंत हातातून खाली ठेववत नाही. कथेच्या ओघात लेखिकेने न्यूयॉर्क शहराचे, तेथील तरुणाईचे सुंदर वर्णन केले आहे. वाचकही मार्गारीटाचा आस्वाद घेता-घेता ‘स्टँड अप’ कॉमेडीचा एखादा शो बघण्यासाठी न्यूयॉर्कला जाण्याच्या मोहात पडतो.