₹300.00
व्लादिमीर पुतिनच्या राजवटीतल्या, घायाळ करणाऱ्या आणि हादरवून टाकणाऱ्या सत्यांना अॅना पोलितकोवस्क्याने तिच्या आधीच्या आणि या डायरीत ज्या प्रकारे उघड केलं आहे, त्यावरून तिला केव्हाना केव्हा कोणीतरी मारून टाकणारच होतं आणि एका प्रकारे ती एवढे दिवस जगली, हाच एक चमत्कार म्हणावा लागेल! सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट तर ही म्हणावी लागेल की, सोव्हिएतनंतरच्या अस्थिरतेच्या काळात एक अशी पत्रकार उभी राहिली, जिने जवळजवळ एकहाती चेचन्याची कुप्रसिद्ध दु:खान्तिका, तसंच आधुनिक रशियाची गैरकृत्यं जगाच्या नजरेसमोर आणली. राजकीय आणि मानवी हक्कांची व्यवस्थेतच मोठ्या प्रमाणावर घडून आलेली पायमल्ली, याचा तिने बुरखा फाडला आणि `रशियन डायरी`त केलेल्या नोंदीतून तिने ते काम सुरूच ठेवलं. हीच ती डायरी, डिसेंबर २००३ ते २००५ च्या अखेरपर्यंत भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पार्लमेंटरी निवडणुका आणि बेसलानच्या शाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर उठलेला गदारोळ यांच्या नोंदी ठेवणारी! अॅना पोलितकोवस्क्याला जगू देण्यात आलं नसतं, याची जणूकाही भविष्यवाणीच तिची `ए रशियन डायरी` वाचताना झाल्यासारखी भासते. तिच्या मॉस्को येथील अपार्टमेंट ब्लॉकच्या जिन्यात, सुपारी घेऊन एका भाडोत्री मारेक-याने केलेली तिची भयानक हत्या घडल्याचं तुम्हाला ठाऊक असल्याने तिचा हा शेवट अटळ होता, हे प्रकर्षाने जाणवतं.