₹250.00
जेफ्री आर्चर यांचा ‘अ क्विव्हर फुल ऑफ अॅरोज’ हा कथासंग्रह शीर्षकाला अगदी सार्थ ठरवणारा आहे. जेफ्रीच्या भात्यातला प्रत्येक बाण अगदी धारदार आहे. या बारा कथांमधील प्रत्येक कथा वाचकांच्या मनावर जबरदस्त परिणाम घडवून आणते. कथालेखनात जेफ्री आर्चर यांचा हात कुणीच धरू शकणार नाही. त्यांच्या कथेचा शेवट नक्की कसा होणार आहे याचा अगदी शेवटच्या ओळीपर्यंतसुद्धा वाचकाला अंदाज येऊ शकत नाही. या पुस्तकातील बारा कथांपैकी प्रत्येक कथा एका वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी, एका वैशिष्ट्यपूर्ण वातावरणात घडते. मग ते ठिकाण प्राचीन बेथलहेम असो नाहीतर ब्राझीलमधील पंचतारांकित हॉटेल असो. एक गोष्ट तर उघडच आहे, या प्रत्येक ठिकाणाचा, तसंच गोष्टीत चित्रित केलेल्या कालखंडाचा जेफ्री आर्चर यांनी तपशीलवार अभ्यास केलेला आहे. त्या संदर्भात पुष्कळ संशोधन केलेलं आहे. जेफ्री यांच्या कथांचे विषयही अत्यंत वैविध्यपूर्ण असतात. प्रेम, राजकारण, विनोद यांपैकी कोणत्याही विषयावरील त्यांची कथा तेवढीच रोचक आणि उत्कंठावर्धक असते. जेफ्री आर्चर यांना ‘मास्टर स्टोरीटेलर’ असं म्हटलं जातं, कारण विंचवाचा डंख जसा त्याच्या शेपटीच्या टोकात असतो, त्याचप्रमाणे जेफ्री यांच्या प्रत्येक कथेचा शेवट वाचकांची मती गुंग करून टाकणारा असतो. शेवटच्या क्षणी त्यांची कथा असं काही अनपेक्षित, वेगळंच वळण घेते की, वाचकाला आधी त्याचा काही अंदाजच येऊ शकत नाही. अ क्विव्हर फुल ऑफ अॅरोज हा कथासंग्रहही याला अपवाद नाही. सोदबीज्च्या लिलावगृहामध्ये खरेदीसाठी आलेल्या एका कलासक्त रसिकाला, एका लहानशा संगमरवरात कोरलेल्या चिनी मूर्तीमध्ये एक विलक्षण रहस्य दडलेलं सापडतं. अभिजात साहित्याच्या अभ्यासात रममाण होणारा एक तरुण आणि एक तरुणी परस्परांशी स्पर्धा, हेवेदावे आणि चढाओढ करता करता एकमेकांमध्ये असे काही गुंतून जातात, की तो अनुबंध त्यांच्या मृत्यूनंतरही तुटत नाही. न्यूयॉर्कच्या एका पंचतारांकित मेजवानीच्या वेळी अनपेक्षितरीत्या एका लेखकाची गाठ त्याच्या जुन्या चाहत्याशी पडते आणि ती त्याला भूतकाळात घेऊन जाते.