₹600.00
संत तुकारामांच्या अलौकिक जीवनावर आणि त्यांच्या प्रतिभाशाली अभंगसृष्टीवर विपुल साहित्य उपलब्ध आहे. त्या साहित्यामध्ये आपल्या अंगभूत वैशिष्टयांमुळे विशेष उठून दिसेल, असा हा प्रबंध आहे… तुकारामांच्या अभंगांमध्ये त्यांच्या आत्मचरित्राचे जे प्रतिबिंब पडले आहे, त्यावरून त्यांच्या जन्म-निर्याण शकांची निश्चिती करणारा हा प्रबंध त्यांच्या समर्थ रामदासांशी व शिवाजी महाराजांशी झालेल्या भेटींबाबतही साधकबाधक चर्चा करतो. तुकारामांचा आध्यात्मिक जीवनविकास कसा होत गेला, त्यांना कोणकोणते पारमार्थिक अनुभव आले, त्यांना ‘भक्तिपंथ बहु सोपा’ का वाटला, याचा तौलनिक अभ्यास या ग्रंथात आढळतो. त्यांच्या ऐहिक आणि पारमार्थिक शिकवणीचे मुद्देसूद विवेचन जसे आपल्यासमोरयेते, तसाच त्यांच्या अभंगांचा साहित्यशास्त्रीय आस्वादही घेतला जातो. बाबांच्या शिकवणुकीवर, तत्त्वज्ञानावर आणि कवित्वावर देशीविदेशी टीकाकारांनी घेतलेल्या वेगवेगळया आक्षेपांची यथोचित दखल घेत पुढे जाणारा हा ग्रंथ अखेरीस त्यांच्या अवतारसमाप्तीच्या पद्धतीवर विशेष प्रकाशझोत टाकतो. तुकारामांच्या अभंगांची विविधांगी चिकित्सा करणा-या या ग्रंथाचे सर्वांत महत्त्वपूर्ण वैशिष्टय म्हणजे त्यांच्या ‘सदेह वैकुंठगमना’ची पातंजल योगसूत्रांच्या आधाराने केलेली उकल. सिद्धिसामर्थ्याने आपला देह आपल्या इच्छेनुसार पंचमहाभूतांत विलीन करून घेता येतो, असे स्पष्टपणे सांगणारी सूत्रे पातंजलयोगशास्त्रात आहेत, हे अभ्यासकांना पूर्वीपासूनच माहीत होते. तथापि तुकारामांच्या सदेह वैकुंठगमनाची आणि पातंजलयोगसूत्रांची सांगड घालण्याची प्रायोगिक कल्पकता यापूर्वी कुणी दाखवली नव्हती. आपल्याला ॠद्धिसिद्धि प्राप्त झाल्या असल्याची आपल्या अभंगांमधून असंख्य वेळा ग्वाही देणा-या तुकारामांच्या ‘वैकुंठगमना’ची अशी उपपत्ती लावून दाखवणारे साधार विवेचन हे प्रा. डॉ. द. वा. पटवर्धन यांच्या या प्रबंधाचे पताकास्थान आहे.
ज्या प्रबंधासाठी मुंबई विद्यापीठाने प्रा. पटवर्धन यांना विद्यावाचस्पती (डॉक्टरेट) ही पदवी प्रदान केली, तो हा प्रबंध आता संतसाहित्याच्या अभ्यासकांना आणि भाविकांना उपलब्ध होत आहे. तुकारामविषयक मराठी साहित्याच्या दालनात मोलाची भर घालणारा हा ग्रंथ त्या संतश्रेष्ठाबद्दलचे आपले आकलन अधिक समृद्ध करणारा ठरेल, यात काहीच शंका नाही.