₹295.00
‘फॉर हिअर, ऑर टू गो?’ इथेच थांबून आस्वाद घेणार, की इथले खाद्यपदार्थ सोबत घेऊन ‘तिकडे’ जाणार? जगभरातल्या ‘मॅकडोनल्डस्’मध्ये विचारला जाणारा हा प्रश्न. चाळीसपंचेचाळीस वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय मानसिकतेची कुंपणं तोडून महासागर ओलांडण्याचं धाडस करणा-या मराठी माणसांनी उत्तर अमेरिकेत नवं आयुष्य उभारायची धडपड सुरू केली, त्या क्षणापासून या प्रश्नाने त्यांचा पिच्छा पुरवला. ‘इथेच’ राहून इथले होणार? की ‘इकडली’ पुंजी बांधून घेऊन ‘तिकडे’ परत जाणार? खिशात आठ डॉलर्स, बॅगेत वीस किलो सामान आणि अज्ञाताला तोंड देण्याइतपत मनाचा हिय्या एवढ्या भरवश्यावर या माणसांनी दहा हजार मैलांची उडी मारली, तर रात्रीचा दिवस आणि दिवसाची थेट रात्रच. उत्तर अमेरिकेच्या भूमीवर पाय रोवणारी मराठी माणसांची पहिली पिढी. त्या पिढीच्या संघर्षाची ही कहाणी. परक्या देशात रुजण्यासाठी दिलेल्या झुंजीची… सोसलेल्या असह्य ओढाताणीची… अपार कष्टांची… हिमतीची… अपरंपार वैभवाची… झळाळत्या यशाची आणि एकट्या, एकाकी अपयशाचीही!