₹120.00
काळीकुट्ट रात्रं…. मिट्ट काळोख आणि घनदाट जंगल; पायाखालची अनोळखी वाट तुडवत दिएगो चालत होता. तो कुठं जातोय, काय करणार याची त्याला काही कल्पना नव्हती. जंगलातून माकडांच्या भयाण किंकाळ्या कानावर पडत होत्या, बेडकांचे कर्कश्य डराँवऽ डराँवऽ ऐकून पोटात कालवत होतं. हे असं भयाण जंगल त्यानं आजवर कधी पाहिलंही नव्हतं. पहाडी भागातला हा मुलगा, द-याखो-यात त्याचं लहानसं कुटुंब राहायचं. पण काळानं असा काही घात केला की, सारं कुटुंबच तुरुंगाच्या चार भिंतीआड रवाना झालं. दिएगोही तुरंगातच राहायचा, शहरातल्या तुरुंगात. शहरभर पायाला चाकं लावून फिरायचा. त्या तुरुंगात रात्र झाली तरी दिवस सरायचा नाही, रात्रभर तुरुंगातले दिवे उजळायचे, पहारेकरणी काठ्या आपटत इकडून तिकडे फिरायच्या, कोठड्यांच्या दारांना घातलेली कुलुपं उघडायची – बंद व्हायची. चाव्यांचा किलकिलाट कानावर पडायचा. त्यात तुरुंगातली कच्ची-बच्ची रात्री भोकाड पसरायची, कैदी म्हणून जगणा-या त्यांच्या आयाही ओरडायच्या, रडायच्या.