₹360.00
मुल्ला झैफ यांचा जन्म १९६८ मध्ये झांगियाबाद येथे झाला. दुष्काळ व राजकीय अस्थिरता यामुळे तो कुटुंबासह मुशान, रंग्रेझान, चारशाखा अशा ठिकाणी भटकत होता. याच दरम्यान त्याची लहान बहीण आणि वडील यांचा मृत्यू झाला. झैफच्या जन्मानंतर सातच महिन्यांनी त्याची आई देवाघरी गेली होती. राज्यक्रांती झाली आणि साम्यवादी राजवट उदयास आली. केवळ पंधराव्या वर्षीच त्याने शस्त्र हाती घेतले. सोव्हिएत फौजांविरुद्ध तो लढाईत उतरला. १९८५च्या दरम्यान त्याने पाकिस्तानात आयएसआयकडून शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतले. सोव्हिएत फौजांनी माघार घेतल्यावर तो घराकडे परतला; परंतु अफगाणिस्तानातील यादवी युद्धामुळे तो पाकिस्तानला गेला. कंदाहार येथील एका मशिदीत तो ‘इमाम’ म्हणून राहू लागला. १९९४ मध्ये तो तालिबान चळवळीत सहभागी झाला. झैफ मुळात धार्मिक प्रवृत्तीचा होता. तालिबानने हेरात, काबूल काबीज केल्यावर तेथील बँकांचे प्रमुखपद झैफला देण्यात आले. ओसामा-बिन लादेन याचे अफगाणिस्तानात आगमन झाल्यावर प्रभारी संरक्षणमंत्री हे पद झैफला देण्यात आले. तालिबानी राजवटीत झैफने संरक्षणमंत्री तसेच पाकिस्तानातील तालिबानचा वकील म्हणूनही काम केले. सदर पुस्तकात झैफच्या दृष्टिकोनातून अमेरिका व पाकिस्तान यांचे अफगाणिस्तानाविषयी असणारे धोरण, राजकीय स्वार्थ त्याने स्पष्टपणे मांडले आहेत. ९/११च्या हल्ल्यानंतर निर्दोष असतानाही अमेरिकेने त्याला तुरुंगात टाकून पाच वर्षं त्याचा छळ केला. त्याचे ग्वान्टानामो तुरुंगातले अनुभव त्याने सांगितले आहेत. सदर पुस्तक म्हणजे एके काळच्या तालिबान नेत्याची सत्य कहाणीच आहे.