₹290.00
मयादा अल-अस्करीचा जन्म एका शक्तिवान इराकी घराण्यात झाला. तिचे एक आजोबा लॉरेन्स ऑफ अरेबियाच्या बरोबरीने लढले होते, तर दुसरे आजोबा पहिले अरब राष्ट्रवादी मानले जातात. सद्दाम हुसैन आणि त्याची बाथ पार्टी सत्तेवर आली तेव्हा आपल्या एकाकी आयुष्यात एवढे प्रचंड वादळ येईल अशी मयादाला अजिबात कल्पना नव्हती. मयादा— घटस्फोटित, दोन मुलांची आई, लहानमोठी छपाईची कामं करून कसाबसा चरितार्थ चालवणारी़ तिला १९९९ मधील एका सकाळी सद्दामच्या गुप्त पोलिसांनी सरकारविरोधी पत्रकं छापण्याच्या आरोपाखाली अटक करुन अत्यंत कुप्रसिद्ध अशा बलदीयात तुरुंगामध्ये खेचत नेलं, तेव्हा तिला तिच्या एकटेपणाची खरीखुरी जाणीव झाली. आधीच सतरा `सावल्या स्त्रिया` बंदिवान असलेल्या एका दुर्गंधिमय कोठडीमध्ये तिला फेकण्यात आलं. वेगवेगळ्या इराकी सामाजिक स्तरातील या स्त्रियांची नियती मात्र एकच होती – खटल्याविनाच कैद – छळ – आणि मृत्यूची भीती. या छळछावणीत वेळ काढण्यासाठी आधुनिक काळातल्या या शहरजाद्या – या सावल्या स्त्रिया एकमेकींना आपापल्या कहाण्या सांगत दिवस रेटत असत. मयादाच्या खानदानाचा अभिमानास्पद इतिहास, दुसरा राजा फैझलचा वध आणि त्यांच्या आजच्या छळाला कारणीभूत असलेल्या सद्दाम हुसैनशी तिच्या झालेल्या भेटी या तिच्या पूर्वायुष्याबद्दल तिच्या सहकैदी स्त्रियांना फार कुतूहल वाटत असे. अशा या मयादाची कथा आपल्याला इराकचा सुसंस्कृत आणि प्राचीन इतिहास आणि इराकी लोकांचे सुसंस्कृत वर्तन याकडे बघण्याची एक विशेष दृष्टी तर देतेच, परंतु सर्वसामान्य इराकी माणसांच्या आयुष्यामध्ये आणि हृदयामध्ये सद्दामनं जे भयानक भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं, त्याचा भरपूर पुरावाही देते.