₹140.00
परत एकदा फिश फिलॉसॉफीचं महत्त्व अधोरखित करणारं हे पुस्तक आहे. ऱ्होंडा ही गुड समारिटन हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत असते. तिची वरिष्ठ असलेल्या मॅडेलीनने त्या हॉस्पिटलमध्ये फिश फिलॉसॉफीचा अवलंब केलेला असतो. त्यामुळे हॉस्पिटलचं वातावरण चैतन्यमय झालेलं असतं; पण मॅडेलीन ते हॉस्पिटल सोडून जाते आणि त्या हॉस्पिटलची धुरा ऱ्होंडाच्या खांद्यावर येते. मॅडेलीनच्या वेळेला असणारा फिश फिलॉसॉफीचा प्रभाव आता कमी झाल्यामुळे स्टाफची कार्यक्षमता घटलेली असते. या गोष्टीसाठी ऱ्होंडा स्वत:ला जबाबदार धरत असते आणि त्यामुळे चिंतित असते. अशा वेळेला तिची मैत्रीण मार्गो तिला ‘ताकारा टू’ या लोकप्रिय रेस्टॉरंटची मालकीण मिसेस ईशीहाराचं प्रेरणादायी उदाहरण देते. ईशी ऱ्होंडाशी बोलून तिचं मनोबल वाढवते. ऱ्हीडा कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्य आणणण्यासाठी प्रयत्न करायला सज्ज होते; पण त्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये नर्सिंग विभागाची व्हाइस प्रेसिडेंट म्हणून आलेली मेबेल स्कालपेल फिश फिलॉसॉफीला सक्त हरकत घेते. हॉस्पिटलचा डायरेक्टर असलेल्या फिललाही नाइलाजाने तिला दुजोरा द्यावा लागतो. त्यामुळे ऱ्होंडा नाराज होते. दरम्यान, ऱ्होंडाची मुलगी अॅन हिचा दुर्दैवी अपघाती मृत्यू होतो आणि त्यावेळेला स्कालपेल ऱ्होंडाला मानसिक आधार देते आणि मग तिलाही फिश फिलॉसॉफीचं महत्त्व पटतं. हॉस्पिटलसारख्या ठिकाणी रुग्णाबरोबरच हॉस्पिटलच्या स्टाफचंही मनोबल चांगलं असणं आवश्यक असतं. फिश फिलॉसॉफी माणसाच्या मूलभूत भावनांना कशी साद घालते, याचा प्रत्यय घेण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे.