₹450.00
….चरित्रात्मक कादंबरी लिहिणे ही एक मोठी कठीण साधना आहे. त्याकरिता लेखकाच्या अंगी चरित्रकार व कादंबरीकार या दोहोंचेही गुण असावे लागतात. चरित्रकार हा मुख्यत: संशोधक व संचयक असतो; तर कादंबरीकार हा मुख्यत: सर्जक असतो. चरित्रात्मक कादंबरीचा लेखक हा संशोधक, तसाच सर्जकही असावा लागतो. कादंबरी लिहायला घेण्यापूर्वी त्याला चरित्रकाराएवढीच पूर्वतयारी करावी लागते; आणि ती करीत असता संशोधकाचे व्रत कठोरपणे पाळावे लागते. ज्याच्यावर कादंबरी लिहावयाची, त्याचे उत्कृष्ट चरित्र आधीच लिहिले गेले असले, तरीही चरित्रनायकाचा काळ, त्याचे कुटुंबीयांशी, स्नेह्यांशी, विरोधकांशी – एकंदर समाजाशी असलेले संबंध, भावबंध, त्याच्या कार्याचे स्वरूप व महत्त्व, इ.इ. गोष्टींचे पुरे आकलन होण्याकरता चरित्रकाराने केलेल्या संशोधनाचा त्याला नव्याने मागोवा घ्यावा लागतो; एवढेच नव्हे, तर त्याच्याहूनही अधिक संशोधन करावे लागते. ही सर्व पूर्वतयारी झाल्यावरच तो कादंबरी लिहिण्यास पात्र होतो. चरित्रलेखकाएवढीच पूर्वतयारी केल्यावर तो चरित्र लिहावयास न घेता कादंबरी रचण्यास प्रवृत्त होतो, याचे कारण त्याला त्या व्यक्तीच्या जीवनाचे निवेदन करावयाचे नसते, तर त्याच्या जीवनाचा साक्षात्कार घडवावयाचा असतो. त्याकरता त्याचा चरित्रनायक व त्याच्याशी संबंध आलेल्या व्यक्ती यांच्या मनांचे व्यापार कृती-उक्तींच्या द्वारे चित्रित करणे आवश्यक असते. हे साधण्याकरता ‘नामूलं लिख्यते किंचित्’ ही संशोधकाची प्रतिज्ञा विसरून, सर्वज्ञ अशा सर्जकाची भूमिका घेणे त्याला प्राप्त होते; परंतु केवळ पूर्वतयारीच्या वेळी संशोधक आणि निर्मितीच्या वेळी मात्र सर्जक, अशा या दोन अलग अलग भूमिका नसतात. सर्जकाची भूमिका वठवताना संशोधकाची भूमिका त्याला टाकता येत नाही. या दोन्ही भूमिकांतील गुणांची शय्या त्याच्या लेखनात जेव्हा उत्कृष्ट जमते, तेव्हाच चरित्रात्मक कादंबरी यशस्वी होते. –म. वा. धोंड उत्कृष्ट चरित्रात्मक कादंबरी-लेखनाचे उपर्युक्त निकष तंतोतंत पाळून लिहिली गेलेली, द्रष्टे महामानव जोतीराव फुले यांचे क्रांतदर्शी विचार, जीवनकार्य आणि व्यक्तिमत्त्व यांचे एकरस दर्शन प्रथमच घडवणारी चरितकहाणी : ‘म हा त्मा’.