Description
वेताळपंचविशी’ हे लोककथांचे एक संकलन आहे. या संकलनात वेताळमुखाने पंचवीस कथा सांगितलेल्या आहेत, म्हणून त्याला ‘वेताळपंचविशी’ असे नाव दिले गेले आहे. शुकबहात्तरीत ज्याप्रमाणे शुकमुखाने बहात्तर कथा सांगितलेल्या आहेत, त्याचप्रमाणे वेताळपंचविशीत वेताळाला कथांचा वक्ता बनविले आहे. लोकांत प्रचलित असलेल्या कथांचा संग्रह करताना प्राचीन संकलकांनी अशीच क्लृप्ती वारंवार वापरली आहे. कथाकथनाला निमित्त निर्माण करण्यासाठी एक प्रास्ताविक कथा रचावयाची आणि त्या कथेतील एकाला श्रोता आणि एकाला वक्ता बनवून, पुढे क्रमाने कथांचे ग्रथन करीत राहावयाचे, अशी ती क्लृप्ती आहे. ‘पंचतंत्र’-‘हितोपदेशा’मध्ये मूर्ख राजपुत्राला राजनीतीचे शिक्षण देण्याचे निमित्त निर्माण केले आहे, ‘शुकबहात्तरी’त विदेशगमनाला गेलेल्या मालकाच्या पत्नीला व्यभिचारापासून निवृत्त करण्याचे निमित्त आहे, ‘सिंहासनबत्तिशी’ त विक्रमाच्या सिंहासनावर आरूढ होऊ पाहणार्या भोजराजाला बत्तीस पुतळ्यांच्या मुखाने विक्रमाचे थोर गुण सांगण्याचे निमित्त आहे; त्याचप्रमाणे वेताळपंचविशीत विक्रमाच्या (त्रिविक्रमसेनाच्या?) धैर्यशौर्याची व बुद्धिप्रकर्षाची परीक्षा घेण्याचे निमित्त आहे.‘पंचतंत्र’, ‘हितोपदेश’, ‘शुकबहात्तरी’, ‘सिंहासनबत्तीशी’ व ‘वेताळपंचविशी’ हे संस्कृतात ग्रंथित केले गेलेले भारतीय लोकसाहित्याचे अत्यंत लोकप्रिय संग्रह आहेत. या संग्रहांच्या द्वारा संकलित झालेले भारतीय लोककथांचे भांडार सर्वत्र प्रसृत झाले आहे-सर्व भारतीय लोकभाषांत अनुवादितही झाले आहे. त्यांची आबालसुबोधता, रोचकता आणि उद्बोधकता एवढी विलक्षण आहे की, शतके लोटली, तरी त्यांचा ताजेपणा मावळत नाही; त्यांची गोडी उणावत नाही. त्यांच्या उद्बोधकतेला मुळीच बाध येत नाही.
Reviews
There are no reviews yet.