Brand
D.M.MIRASDAR
Birth Date : 14/04/1927
प्रा.द.मा. मिरासदार यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील अकलूज गावी १४ एप्रिल, १९२७ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपूर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील स.प. महाविद्यालयात झाले. त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात ‘दै. भारत’मध्ये पत्रकार म्हणून केली. काही काळ ते ना.सी. फडके संपादित साप्ताहिक ‘झंकार’मध्ये लेखन करत होते. १९५२नंतर मात्र त्यांनी शिक्षक म्हणून पंढरपूर व पुणे येथे काम केले. औरंगाबादमध्ये देवगिरी महाविद्यालयात व पुढे पुण्यातील गरवारे महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत राहून ते निवृत्त झाले. मराठी साहित्यात कथालेखक म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे. ग्रामीण जीवनावर त्यांनी लिहिलेल्या कथा विशेष गाजल्या. मराठी साहित्यात विनोदी साहित्याची परंपरा मोठी आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, चिं.वि. जोशी, पु.ल. देशपांडे यांनी निर्माण केलेली विनोदी साहित्याची समृद्ध परंपरा मिरासदारांनी पुढे चालवली; एवढेच नव्हे, तर ग्रामीण वातावरण आणि विनोदी कथा या दोन धारांना एकत्र आणून एक स्वतंत्र वाट तयार केली. मराठी साहित्याला त्यांनी दिलेली ही मोठी देणगी मानली जाते. एकूण २०पेक्षा जास्त कथासंग्रह, रूपांतरित कादंबऱ्या तसेच ‘मी लाडाची मैना तुमची’ हे वगनाट्य आदि लेखन केले. चित्रपटलेखनाच्या क्षेत्रातही त्यांनी मोठी कामगिरी केली असून ‘एक डाव भुताचा’, ‘ईर्षा’, ‘ठकास महाठक’, ‘गोष्ट धमाल नाम्याची’ आदि अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. उत्कृष्ट पटकथा संवाद लेखनासाठी त्यांना अनेक महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झाले असून लेखक म्हणून त्यांचा ‘गदिमा पुरस्कार’, ‘अत्रे पुरस्कार’, ‘काकासाहेब गाडगीळ पुरस्कार’ तसेच ‘दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच २०१४ सालचा महाराष्ट्र शासनाचा विं.दा. करंदीकर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. १९९८ साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या ७१व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील व द.मा. मिरासदार यांनी महाराष्ट्रात, देशात तसेच परदेशात कथाकथनांचे हजारो कार्यक्रम करून मराठी कथेला लोकप्रिय केले. लेखनाबरोबरच त्यांनी सामाजिक कार्यही केले. अ.भा. विद्यार्थी परिषदेचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी केलेली भाषणे गाजली. संस्कार भारतीचे उपाध्यक्ष तसेच मराठी साहित्य परिषद, पुणेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

Reviews
There are no reviews yet.